जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन


महाराष्ट्रामध्ये मध्ये बहुतेक आंबा बागा पारंपरिक पद्धतीने १० मी. बाय १० मी. अंतरावर लावलेल्या आहेत. वाढत्या वयासोबत झाडांतील शरीरक्रिया संथ होतात.फक्त खोडाची वाढ होऊन आंबा झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे उंच वाढली असून, फलधारणा झाडाच्या शेंड्यालगत होत आहे.  परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.अनियमित फळधारणा,  कमी आकाराची फळे, कमी उत्पादनक्षमता, संयुक्त फुलाचे अत्यल्प प्रमाण,इ. बाबींमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादकता कमी झालेली दिसून येते. १० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या, उत्पादन कमी झालेल्या बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दोन वर्षांमध्ये चांगले उत्पादन मिळू शकेल.

जुन्या आंबा बागांची उत्पादकता घटण्याची कारणे :

 • जुन्या बागामध्ये आंबा झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. प्रकाश संश्लेषलनात अडथळा येतो. परिणामी नवीन पालवी फारच कमी येते.
 • बागांमधील फांद्या एकमेकांवर घुसतात; घासतात, त्यामुळे किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन मोहोर गळून जाऊन उत्पादनात घट होते.
 • अश्या जुन्या आंबा बागेमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने मोहोर, तसेच फळ गळतात.
 • बागांमधील झाडे फार उंच वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते.
 • जुन्या आंबा झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात.

पुनरुज्जीवन

पुनरुज्जीवन म्हणजे छाटणी करून झाडाचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे. जेणेकरून झाडापासून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळावे. केवळ झाडांची खरड छाटणी करणे म्हणजेच पुनरुज्जीवन असा सर्वसाधारण समज आहे. झाडांची छाटणी करणे ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे. 

 • प्रती वर्षी ५०-७०पेक्षा कमी फळे देणारी, १०वर्षांपेक्षा जास्त वयाचीपरंतु पुरेसा विस्तार न झालेली झाडे आणि ज्यांच्या फळांचा आकार २००-२५० ग्राम पेक्षा कमी झालेला आहे, अशी झाडे असणारी बाग निवडावी.
 • बागेमधील सर्व झाडांचे पुनरुज्जीवन एकाचवेळी करू नये. पुनरुज्जीवनासाठी झाडाची छाटणी केल्यानंतर फळधारणेस योग्य विस्तार होण्यासाठी सर्वसाधारणपणे २ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्व झाडांचे पुनरुज्जीवन एकाच वेळी केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद होईल.
 • पुनरुज्जीवनासाठी झाडांची निवड आणि संख्या बागेच्या भौगोलिक स्थितीवरदेखील अवलंबून असते. उताराच्या बागांमध्ये छाटणीसाठी झाडांची निवड करताना पूर्वेकडील किंवा पश्‍चिमेकडील झाडे छाटणीसाठी प्रथम निवडावीत. 
 • बागांमध्ये मध्येच असलेल्या एका दुसऱ्या झाडाची निवड न करता सलग झाडे १५-२०छाटणीसाठी निवडावीत. त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून नवीन फुटव्यांची वाढ उत्तम होईल. 

छाटणी पद्धत :

 • झाडाच्या विस्तारावर छाटणी किती उंचीवर व कोणत्या फांद्यापर्यंत करायची, हे ठरवावे.साधारणपणे ६ ते ७ मीटर झाडांची उंची ठेवून आंबा झाडांच्या वरील भागाची छाटणी करावी.मुख्य खोडापासून तिसऱ्या फांद्यांवर झाडाची छाटणी करावी. 
 • छाटणी कमी उंचीवर केल्यास झाडांवरील फांद्या फारच कमी राहतात, परिणामी उत्पादनात घट येते.छाटणी जास्त उंचीवर केल्यास अनुत्पादित फांद्या या झाडांवर राहतात, यामुळे पुढील छाटणी लवकर करावी लागते.
 • मुख्य खोड किंवा दुय्यम फांद्यांवर छाटणी केल्यास झाड मरण्याची शक्‍यता असते. तसेच झाडाचा पुरेसा विस्तार होण्यास जास्त कालावधी लागतो. अशा छाटणीमुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यतादेखील बळावते. 
 • काही कमी वयाच्याबागांमधील झाडे अत्यंत घनदाट झालेली दिसून येतात.
  अशा झाडांचे पुनरुज्जीवन करताना मध्यफांदी पूर्णपणे काढावी. विस्तार पुन्हा वाढल्यावरदेखील झाडाचा मध्यभाग पूर्णपणे मोकळा राहून सूर्यप्रकाश झाडाच्या आतील भागापर्यंत पोहोचतो.
 • फांद्या तोडताना झाडांना छत्रीसारखा (डोम) आकार द्यावा.
 • फांद्या तोडताना झाडांची साल निघणार नाही, फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी तीक्ष्ण हत्याराने करावी.झाडांची योग्य उंचीवर चेन सॉ किंवा लांब दांडा असलेली यांत्रिक करवतयांच्या सहायाने छाटणी करावी. यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी केल्यास काप एकसारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो. यांत्रिक करवती उपलब्ध नसतील, तर पारंपरिक कोयता व कुऱ्हाडीसारखे पारंपरिक हत्यार वापरून देखील छाटणी करता येते.
 • बाहेरील बाजूकडे निमूळता तिरकस काप दिल्यामुळे पावसाचे किंवा दवाचे पाणी सहजपणे निथळून जाण्यास मदत होते. छाटणी करताना सपाट अथवा बुंध्याकडे पाणी निथळून येईल, असा तिरकस काप देऊ नये. 

छाटणीचा हंगाम 

झाडांची छाटणी दोन हंगामामध्ये करता येते.

१) फेब्रुवारी-मार्च छाटणी 

जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन करण्यासाठीची छाटणी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्येदेखील करता येते. सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यामध्ये झाडे मोहरण्याची शक्‍यता असल्याने छाटणी टाळली जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत फळधारणा न झालेल्या झाडांची छाटणी करण्यास शेतकरी त्वरित तयार होतात आणि नवीन आलेली पालवी पावसात सापडत नाही.मात्र, या काळात जमिनीमधील ओलावा कमी असल्याने छाटणीनंतर झाडांना पाणी देण्याची गरज असते. त्यासाठी पाण्याची उपलब्धता आवश्‍यक असते. अन्यथा अशा झाडांना नवीन पालवी लवकर येत नाही. काहीवेळा झाड मरण्याची शक्‍यता असते. तसेच छाटणीनंतर पालवी येईपर्यंत पावसाळा सुरू झाल्याने नवीन पालवीवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यापासून संरक्षणासाठी उपाययोजना वेळीच करणे अत्यंत आवश्‍यक राहते. 

२) सप्टेंबर-ऑक्टोबर छाटणी :

पावसाळा संपल्यानंतर थंडी सुरू होण्यापूर्वीचा हंगाम म्हणजेच सर्वसाधारणपणे सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिना हा छाटणीसाठीचा सर्वोत्तम हंगाम असल्याचे आढळून आले. या हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असतो. या वेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण पावसाळ्याच्या तुलनेत कमी असल्याने छाटणीनंतर येणारी पालवी लवकर, निरोगी व सदृढ असते. उत्तम हवामानामुळे छाटणीनंतर झाडाची मर होण्याची शक्‍यता कमी असते. नवीन येणाऱ्या पालवीचे नियोजन तसेच या पालवीचे रोग किडींपासून करावयाचे संरक्षण सहजपणे करता येते. वातावरण थंड असल्याने खोड किडा तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी असते.

छाटणीनंतर घ्यावयाची काळजी 

 • कापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बागेबाहेर काढून बाग स्वच्छ करावी. 
 • छाटणी केलेल्या फांद्यांना करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी, तसेच आंबा झाडावर येणाऱ्या खोडकिडीच्या बंदोबस्त करावा.
 • नवीन पालवी फुटू लागल्यानंतर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. पालवीचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी पालवी जूनी होईपर्यंत दर १५दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
 • छाटणी केल्यानंतर पालवी लवकर पक्व होण्यासाठी झाडावर २% युरिया खताची फवारणी करावी व पाणी व्यावास्थापनेवर विशेष लक्ष द्यावे.
 • २ ते ३ महिन्यांनी नवीन पालवीतील जोमदार फांद्या ठेवून साधारणपणे ५०% पालवीची विरळणी करावी.
 • छाटणीनंतर एक ते दीड वर्षे पालवी जुनी झाल्यावर१५ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत झाडांना आकारमानानुसार(३ मि.लि. प्रतिमीटर व्यास विस्ताराप्रमाणे) २२.५% तीव्रतेचे पॅक्‍लोब्युट्राझॉल द्यावे.छाटणी केलेल्या झाडांना पॅक्‍लोब्युट्राझॉल न दिल्यास पहिली ३-४ वर्षेफांद्यांची फक्त वाढच होत राहते, मोहोर व फळधारणा होत नाही. त्यानंतर पुढे वर्षाआड फळधारणा होते. पॅक्‍लोब्युट्राझॉल दिल्याने मोहोर २ ते 3 आठवडे लवकर येतो, मोहोराची टक्केवारी वाढते, मोहोरातील संयुक्त फुलांचे प्रमाण वाढते, प्रतिझाड फळांचे प्रमाण वाढते, तसेच सर्व फळे एकाच वेळेस काढणीस येतात. फळांचे एकरी उत्पादन साधारणपणे ४ ते ५ टन मिळते.

फुटव्यांचे व्यवस्थापन:

 • जुन्या आंबा बागेची छाटणी केल्यानंतर लगेचच खोडातील सुप्त डोळे जागृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. छाटणीपासून सर्वसाधारणपणे ४०ते ६०दिवसांनी नवीन फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू होते. नवीन फुटवे येण्यासाठी लागणारा कालावधी झाडाचे वय व जमिनीमध्ये असलेला ओलावा यावर अवलंबून असतो. खूप जुन्या झाडांची छाटणी केल्यास नवीन फुटवे येण्यासाठीचा कालावधी यापेक्षा जास्त असू शकतो. 
 • छाटणी केलेल्या जागेपासून अर्धा ते पाऊण फुटामध्ये जोमदार असे असंख्य फुटवे येतात. त्या फुटव्यांपैकी सशक्त असलेले ३ते ४फुटवे फांदीच्या चारही बाजूस राखावेत. उर्वरीत फुटव्यांची विरळणी करावी. अशी विरळणी २० ते २५दिवसांच्या अंतराने ३ते ४वेळा करावी. त्यानंतर खोडावर खालील बाजूसही फुटवे येऊ लागतात. या फुटव्यांचीदेखील आवश्‍यकतेप्रमाणे विरळणी करून दर अर्धा ते १ फुटावर फांदीच्या चारही बाजूस एक-एक जोमदार फुटवा राहील, याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने विरळणी केल्यावर संपूर्ण खोडावर नवीन फांद्या विकसित होतात. 
 • विरळणी केल्यानंतर राखलेले फुटवे बळकट करण्यासाठी फुटव्यावर दोनदा नवीन फूट आल्यावर दुसऱ्या नवीन फुटीचा डोळा खुडावा. यामुळे ही फूट सशक्त व जाड होण्यास मदत होते. तसेच खुंटलेल्या डोळ्यापासून २ ते ३ नवीन फांद्या फुटतात. अशा रीतीने झाडाचा विस्तार वाढण्यास मदत होते. 

पुनरुज्जीवनासाठी आंब्याची छाटणी केल्यानंतर झाड मोहोर व फळे येण्यायोग्य होण्यास सर्वसाधारणपणे दोन वर्षाचा कालावधी लागतो. या काळात योग्य खत व्यवस्थापन, झाडाचे रोग व किडीपासून संरक्षण तसेच पॅक्‍लोब्युट्राझॉलचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा लागतो. छाटणीनंतर झाडाची योग्य काळजी न घेतल्यास, मोहोर येण्यास व उत्पादन सुरू होण्यास जास्त कालावधी लागू शकतो, पहिल्याप्रमाणे अथवा कमी उत्पन्न मिळू शकते हे आंबा बागायतदारांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.