पेरूची लागवड


पेरूची लागवड

प्रदीप भोर

पेरूची लागवड, भारत, मलाया, ब्रम्हादेश, अमेरिका, दक्षिण चीन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. पेरूचे मूळस्थान मेक्सिको असून भारतामध्ये या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यात क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. लागवड आणि उत्पादनाच्या दृष्टीकोनातून या फळझाडाचा चौथा क्रमांक लागतो. महराष्ट्रात प्रमुख्याने नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये लागवड आढळून येते.
हवामान – पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबांधाच्या प्रदेशामध्ये केली जाते. हिवाळ्यामध्ये अधिक थंडी असलेल्या प्रदेशात फळांची गुणवत्ता अधिक चांगली राहते. पेरूचे झाड काटक तसेच पाण्याचा ताण सहन करणारे असल्याने दुष्काळी भागात देखील बाग पाण्याचा ताण सहन करते. समुद्रसपाटीपासुन 1500 मी उंची पर्यंत आणि वार्षिक पर्जन्यमान 1000 मीमी पर्य़ंत असलेल्या भुभागात पेरुची वाढ चांगली होते.
जमीन – पेरु हे काटक फळझाड असुन सर्व प्रकारच्या जमिनीत लागवडीस योग्य आहे. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या, हलक्या मध्यम ते काळ्या जमिनीत पेरूची लागवड करावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्व साधारण जमिनीचा सामू 6.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. पाण्याचा निचरा न होणाऱ्या चोपण जमिनीत पेरूची लागवड करणे टाळावे कारण पाणथळ जमिनीत वाढ होत नाही.
सुधारित जाती – पेरूच्या गरावरून दोन जाती आढळून येतात. एक म्हणजे पांढऱ्या गराचा सफेद पेरू आणि दुसरा लाल गारच गुलाबी पेरू. सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे. काही जाती आकार, रंग, सालीचा प्रकार, किंवा प्रदेश यांच्या नावावरून ओळखल्या जातात.
१) लखनौ -४९ – ही जात सरदार पेरु या नावाने ही प्रचलित आहे. निवड पद्धतीने ही जात तयार करण्यात आली आहे. या जातीची फळे आकाराने मोठी व गोल ते अंडाकृती आकाराचे असतात. शिवाय फळांत बियांनी संख्या कमी असते. सालीचा रंग पिवळसर तर गर सफेद, घट्ट, मऊ, असून चवीस गोड असतो. फळात एकुण साखरचे प्रमाण व जिवनसत्व क अधिक प्रमाणात असते. झाडे उंच न वाढता पसरट (आडवी) व जलद वाढतात. यामुळे फळधारणा जास्त होते. ही जात उत्पादनास चांगली असून महाराष्ट्रात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
२) लखनौ ४६ – ही जात सुध्दा निवड पद्धतीने तयार केली असून या जातीचे झाड आकराने लहान असून फार सावकाश वाढते. फळ अंडाकृती, मध्यम आकाराची असून फळाची साल गुळगुळीत असते व पिकल्यावर ती पिवळी पडते. गर गोड असून बिया मऊ असतात. उत्पादन सरदार जातीपेक्षा कमी आहे.
३) नाशिक – या जातीची झाडे सरळ व उंच वाढतात. फळ बाटलीसारखे देठाकडे निमुळते व लांब असते. फळाची साल खडबडीत असते. बिया गराच्या मध्यभागी एकवटलेल्या असतात. गर घट्ट व गोड असतो. फळ टणक टिकाऊ असते. म्हणून दूरच्या मार्केटला पाठविता येते. कँकर रोगस प्रतिकारक्षम आहे.
४) धारवाड – धारवाड जातीचे झाड मध्यम आकराचे असून फळ लहान असून देठाकडील भाग निमुळता असतो. फळे टणक व टिकाऊ असून बियांचे प्रमाण अधिक असते. या जातीचे उत्पादन कमी आहे.
५) अलहाबाद सफेदा – हि जात अलहाबाद येथे प्रसिध्द आहे. हि जात बियाव्दारे अभिवृध्दीकेल्याने या जातीच्या गुणधर्मात फरक दिसुन येतो. फळाचा आकार मोठा, गोलाकार तर साल मऊ व पांढ-या पिवळसर रंगाची असते.
६) बियारहित – या प्रकारीतील सर्व जाती जवळपास एक सारख्याच गुणधर्माच्या असतात. या जातीची अभिवृध्दी खोडापासुन निघणा-या फुटव्यापासुन होते. फळे मोठ्या व अनियमित आकाराची असतात.
७) ललित – हि जात नव्यानेच लखनऊ येथील संशोधन केंद्राने प्रसारीत केली आहे. फळ मध्यम आकाराचे, आकर्षक पिवळसर लाल रंगाचे असते. गर गुलाबी घट्ट असतो.
अभिवृद्धी – पेरूची अभिवृद्धी ही बियांपासून तसेच कलमापासून केली जाते. कलमांमध्ये दाब कलम, भेटकलम, गुटीकलम या पद्धतींचा अवलंब केला जातो. दाब कलम हि पध्दत सर्वाधिक वापरली जाते.
लागवड – लागवडी पुर्वी सपाटीकरण करुन खोलवर नागरट करावी. साधारणपणे मे महिन्यात जमिनीची आखणी करून 6 बाय 6 मी अंतरावर 0.6 x 0.6 x 0.6 आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना तळाशी पालापाचोळा घालून त्यावर चांगले कुजलेले शेणखत, चांगल्या माती आणि बुरशीनाशकाने खड्डे भरून घ्यावेत. पावसाळ्यातील पहिला पाऊस झाल्यानंतर कलम केलेली रोपे त्यामध्ये लावावीत.
आंतरपिके – बहार धरण्यापुर्वी पेरुच्या बागेत दोन ओळीत जागेत आंतरपिके घ्यावीत. सुरवातीच्या 3- 4 वर्ष भाजीपाला वर्गातील वांगी, गाजर, मुळा भेंडी या सारखी पिके घ्यावीत. तसेच डाळवर्गीय पिकांतील वटाणा, हरभरा, वाल, इतर पिके घ्यावीत. फळधारणे नंतर आंतरपिंकाची लागवड करु नये.
खत : पेरु पिकात खताची मात्रा जाती, पिकाचे वय, मातीची गुणवत्ता, मशागतीय पध्दती नुसार द्यावी. सर्व साधारणत परिस्थितीत खालील प्रमाणे खताच्या मात्रांची शिफारस केली आहे.
झाडाचे वय (वर्ष) शेणखत (किलो प्रती झाड) युरिया (ग्रम प्रती झाड) सिंगल सुपर फॉस्फेट (किलो प्रती झाड) मुरेट ऑफ पोटश (ग्रम प्रती झाड)
1-3 10-20 150-200 0.5-1.5 100-400
4-6 25-40 300-600 1.5-2.0 600-1000
7-10 40-50 750-1000 2.0-2.5 1100-1500
10 च्या वरिल 50 1000 2.5 1500
शेणखताची मात्रा मे महिन्यात एकदाच द्यावी तर रासायनिक खताची आर्धी मात्रा मे-जुन मध्ये आणि उर्वरीत मात्रा सप्टेंबर- ऑक्टो. मध्ये द्यावी. वरील खते वापरताना ती खोडाभोवती बांगडी पद्धती ने गाडून द्यावीत. खत दिल्यानंतर बागेस पाणी द्यावे.
पाणी – सुरवातीला बागेस उन्हाळ्यामध्ये 7 ते 8 दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. याप्रमाणे फळधारणा होईपर्यंत किंवा ४ वर्षापर्यंत पाणी द्यावे. बहार धरल्यानंतर फुले निघाल्यापासून फळे तयार होईपर्यंत आणि विशेषत: फळे पोसण्याच्या काळामध्ये बागेस 7 ते 8 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळांची काढणी झाल्यानंतर बागेस उन्हाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात 25 ते 30 दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. दुसऱ्या बहाराची फुले लागेपर्यंत गरजेपुरतेच पाणी द्यावे.
बहार धरणे – पेरूला वर्षातून ३ वेळा बहार येतो. बहाराची फुले जून, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात. जूनमध्ये फुले येणार्या बहाराला मृग बहार, ऑक्टोबर महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला हस्त बहार तर जानेवारी महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला आंबेबहार म्हणतात.
कीड व रोग –
१) साल व शेंडा पोखरणारी अळी –
या किडीचा प्रादुर्भाव पेरूवर मोठ्या प्रमाणात होत असतो. विशेषत: दुर्लक्षित बागेमध्ये हा प्रादुर्भाव आढळतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी खोड, फांदी यांच्या सालीच्या आतील बाजूस शिरून आतील भागावर उपजीविका करते. त्यावेळेला ती सालीच्या भुसकाटात व तिच्या शरीरातून निघणाऱ्या धाग्यापासून तयार झालेल्या जाळीत लपून बसते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास झाड सुकते व वाळते.
या किडीच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. अळीच्या छिद्रात लोखंडी तार टाकुन अळी मारावी. पेट्रोलमध्ये किटकनाशक २:१ प्रमाणात मिसळून त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो बोळा तारेच्या सहाय्याने छिद्रात घालावा व वरून छिद्र चिखलाने लिंपावे.
2) फळमाशी : पेरूवर या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या हंगामात अधिक प्रमाणात दिसून येतो. पुर्ण वाढ झालेली मादी. फळाच्या सालीमध्ये होल पाडून अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ पोखरून गरामध्ये बसतात. त्यामुळे फळ कुजते. आल्या मोठ्या होतात तसा फळाचा कुजलेला भाग वाढत जाऊन फळे गळू लागतात. फळे खाण्यास अयोग्य असतात.
या किडीच्या निंयत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त फळे गोळाकरुन नष्ट करावीत. खोडाभवतीची माती मोकळी करावी. फळधारणा झाल्यानंतर बागेत प्रती हेक्टरी 10 फळमाशी मक्षकारी सापळे वापरावेत. रासयनिक आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी.
रोग –
१) पेरू फळावरील देवी रोग – हा बुरशीजन्य रोग असून याला देवी किंवा खैऱ्या असेही म्हणतात. सतत भरपूर पाऊस व जास्त दमट हवा यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. बुरशीची वाढ फळांच्या सालीवर होऊन लहान लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. लालसर ठिपक्यासाठी फळाची बाह्यसाल गोलाकार, करवतीसारखी फाटते व फळे तडकतात. फळावर गोलाकार काळ्या पुळ्या दिसतात.
या रोगाच्या नियंत्रणासाठी 15 दिवसांच्या आंतराने बोर्डो मिश्रणाच्या 3 ते 4 फवारण्या कराव्यात.
2. करपा – या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. झाड शेंड्याकडुन खालील भागाकडे वाळण्यास सुरवात होते. या रोगाचा प्रादुर्भाव फळ, पाने फांदी या वर दिसुन येतो.
या रोगाच्या निंयत्रणासाठी कॉपर ऑक्सीकॉरोईड किंवा बोर्डो मिश्रणा ची फवारणी 7 दिवसांच्या अंतराने आलटुन पासटुन करावी तर प्रतिबंधकात्मक म्हणुन डायथेन झेड 78 ची दर महिन्याला फवारणी करावी.
पेरूची काढणी – फुले आल्यानंतर १२ दिवसांत फलधारणा होते. लहान फळे सुरुवातीला झपाट्यानने वाढतात. नंतर त्यांची वाढ थोडी मंदावते व पुन्हा जोरात वाढतात. सरदार (लखनौ – ४९) ह्या जातीचे पेरू तयार होण्यास १०५ ते १३५ दिवस लागतात. थंडी अधिक असल्यास फळे पिकण्यास वेळ लागतो. तर तापमान अधिक असल्यास ती लवकर पिकतात. लाल गर असलेल्या पेरूमध्ये सुरुवातीला ‘टॉंरटॉंरीक आम्ल’ (चिंचेसारख्या चवीचे) असते. फळ पिकताना मात्र त्यात ‘सायट्रीक आम्ल’ (लिंबूवर्गीय फळांच्या चवीसारखे) असते. सिडलेस जातीत सुरूवातीस आम्लाचे प्रमाण जास्त असते. मात्र बियायुक्त जातीत आम्लाचे प्रमाण फळे तयार होताना जास्त असते.
फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन ती फळे हिरवट पिवळसर झाली म्हणजे ती तयार झाली असे समजावे, तसेच फळे पिकताना किंचीत मऊ होतात. तोडणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी करावी. फळे वाहतुकीसाठी पानांनी आच्छादलेल्या टोपल्या किंवा प्लॅस्टिक क्रेटसचा वापर करावा. फळांचा मोठा ढिग न करता सावलीत पसरून लावावीत. किडलेली, डागाळलेली व खराब फळे बाजूला निवडून काढावीत. फळे तोडताना फळांना देठ ठेवू नये, त्याने फळे खराब होतात.
उत्पादन : रोपांपासून तयार केलेल्या झाडांना तिसऱ्या ते चौथ्या वर्षी फळे लागतात. तर कलमापासून तयार केलेल्या झाडांना २ ऱ्या वर्षापासून बहार धरता येतो. कलमी पेरूचा मृग बहार धरल्यास सरासरी १००० ते २००० फळे (२०० ते ३५० किलो) मिळतात.

Have any Question or Comment?

One comment on “पेरूची लागवड

Sukhdeo Jamdhade

अभिनंदन , खूप सुंदर आहे वेबसाईट

Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.