मशरूम (आळिंबी) उत्पादन तंत्रज्ञान – डॉ. विनायक शिंदे पाटील, अहमदनगर


मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते. पावसाळ्यात निसर्गात ही वनस्पती आपल्याला आढळते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते. निसर्गात अनेक मुशरूम आढळतात. परंतु त्यात काही विषारी देखील असतात. मशरूम जगात १२,००० हून अधिक जाती आहेत. आज जागतिक मशरूम उत्पादन ८.४९५ दशलक्ष मॅट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोप, २७% उत्तर अमेरिका व १४% पूर्व आशिया खंडात घेतले जाते. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत केली जाते. जर्मनीमध्ये मशरूमचे सर्वात अधिक सेवन केले जाते.

हजारो वर्षांपासून मशरूमचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. सुमारे ४०० बी.सी. काळामध्ये ग्रीक लोकांनी प्रथम मशरूमचा खाण्यासाठी वापर सुरु केला. इजिप्तमध्ये मात्र ‘फराहों’साठी मशरूम वाढविले गेले. सामान्य माणसासाठी ते फार ‘नाजूक’ समजले जात असत. रोमन लोक मशरूम म्हणजे ‘देवाचे खाणे’ समजत आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, मशरूममुळे अधिक ताकद, उत्साह वाढवण्यास मदत होते. फ्रान्समध्ये १७ व १८ शतकांमध्ये मोठ्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन घेणे सुरु झाले. स्वीडनमध्ये प्रथम ‘ग्रीनहाऊस’ मध्ये मशरूम उत्पादन घेणे सुरू झाले व १९व्या शतकांमध्ये इंग्लंडमध्येही ते सुरु झाले. अमेरिकेमध्ये १८९० पासून व्यावसायिकदृष्ट्या प्रथमच मशरूम उत्पादन सुरु झाले. पोलंड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान व आता जगभर सर्वत्र स्वादिष्ट अन्न म्हणून मशरूम आवडीने खाल्ले जातात.

भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूम वरील संशोधनानंतर मशरूम मध्ये ‘अॅन्टी व्हायरल’ व ‘अॅन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत.

भारतामध्ये बटन (Agaricus bisporus), शिंपला (Pleurotus spp.), धानपेढ्यांवरील (Volvariella volvacea) या जातीच्या मशरूमची लागवड केली जाते.

बटन मशरूम :

बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते. नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) :

संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन घेऊ शकतो.

मशरूम लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक  आहेत:

१. जागा : मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.

२. पाणी : पाणी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मशरूम उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे.

३. कच्चा माल : आळिंबी मशरूम करिता कच्चा माल म्हणजे शेतीमधील टाकाऊ घटक :

  • (१) गव्हाचा भुसा, (२) कपाशीच्या काड्या, (३) भाताचा पेंढा, (४) गवत, (५) सोयाबीनचा भुसा, (६) कडबा इत्यादी.

आळिंबी उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असते. कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक आळिंबीचे महत्वाचे अन्न आहे. सेल्युलोज ज्या घटकात अधिक, त्यावर आळिंबीचे उत्त्पन्न अधिक येते.

घटक पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा हवा. तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठविताना बंदिस्त जागेचा वापर करावा.

४. प्लास्टिक : आळिंबी उत्त्पादानाकरिता प्लॅस्टिक पॉलीप्रॅपिलीनचे वापरावे व जाडी (गेज) ८०-१०० वापरावा. प्लॅस्टिकचा आकार १८ बाय २२ इंच किवा २२ बाय २७ इंच असावा.

५. बियाणे : आळिंबीच्या बियाणांस स्पॉन असे म्हणतात. गव्हाच्या दाण्यावर मशरूमच्या बिजाणूंची वाढ केली जाते. प्लॅस्टिकच्या पिशवीत ५०० ग्रॅम, १ कि.ग्रॅ. या मापात हे बियाणे उपलब्ध असते.

६. वातावरण : मशरूमकरिता वातावरण हे अंधारमय हवे. वातावरणात आद्रता ७० ते ८०% , तापमान १८ ते २८ अंश सेल्सियस असावे. उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे ही एक महत्वाची बाब आहे.

७. यंत्रसामग्री : आळिंबी उत्पादनाकरीता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही.

१. ड्रम – (कच्चा माल भिजवण्यासाठी )

२. हिटर – (पाणी गरम करण्या करिता )

३. फोगर्स / ह्युमिडी फायर – (वातावरण नियंत्रित)

४. ड्रायर – आळिंबी वाळविण्याकरिता

५. थर्मामीटर – तापमानाची नोंद ठेवण्याकरिता

६. हेअर हायग्रोमीटर – आद्रता दर्शवण्याकरिता

धिंगरी आळिंबीचे निरनिराळ्या पालापाचोळ्यावर मिळणारे उत्पादन :

अ.    नं. घटक (१ कि.ग्रॅ. वाळलेले) उत्पादन ताजे (ग्रॅम)
१. कपाशीची पाने काड्या ८२०
२. भाताचे काड ५६०
३. गव्हाचे काड ५२०
४. सोयाबीनची पाने / काड्या ५४०
५. ज्वारीचा कडबा ४५०
६. गवत ४४०
७. सूर्यफुलाची ताटे ३५०
८. बाजरीची पाने ३७०
९. नारळाची पाने ३४०
१०. उसाचे पाचट ३२०

आळिंबी लागवड प्रक्रिया :

आळिंबी लागवडीमध्ये योग्य व्यवस्थापन हीच यशाची गुरुकिल्ली असते.

१. काड भिजवणे : प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.

२. निर्जंतुकीकरण : निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.

काड भिजवणे → १२ ते १५ तास → गरम पाण्यात निर्जंतुक करणे

↓ १ तास

पिशव्यांमध्ये बी भरणे

उबविणे

↓ १४ ते २० दिवस

पिशवी काढणे

↓ २-३ दिवस

१ ली काढणी

↓ ४-६ दिवस

२ री काढणी

↓ ५-६ दिवस

३ री काढणी

३. बी पेरणे : प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी. बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोऱ्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.

४. उबविणे : बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.

५. पिशवी काढणे : पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.

६. काढणी : मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात. एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.

७. साठवण : ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूम उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :

१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.

२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.

३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.

४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.

५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.

६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.

७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.

८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.

९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.

१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.

११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.

१२. रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)

१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.

१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.

१५. मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.

अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

मशरूमची विक्री व्यवस्था :

मशरूमची विक्री दोन प्रमुख घटकांत मोडते.

१) ताजे मशरूम २५ ते ३० रुपये प्रति किलो घाऊक दराने विकले जातात. पुणे- मुंबईत भाजी मंडईत सहज विक्री होत आहे.

२) वाळवलेले मशरूम विक्री हा ताज्या मशरूम पेक्षा विक्रीस सोपा प्रकार आहे. ताजे मशरूम वाळवून (सूर्यप्रकाशात/ड्रायर मध्ये) सीलबंद केल्यास ३ वर्षे टिकतात. त्यामुळे खराब होण्याची भीती नाही. वाळविलेले मशरूम २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जातात.

औषधी गुणधर्म :

मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढी साठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.

१. मधुमेही व्यक्तींकरिता उपयुक्त : मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.

२. मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त.

३. लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम अन्न : कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.

४. स्कर्व्ही रोगापासून बचाव : मशरूममध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.

५. पचनक्रिया सुरळीत ठेवण्य करिता मदत करणारे अन्न : मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात.

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता लेखक व प्रकाशक जबाबदार राहणार नाही.)

– डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर 

(एम.एस.सी., पी.एच.डी. होर्टी. फळशास्त्र)

सहयोगी संशोधक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
—————————————————————————————————————-

कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहितीवाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो… त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात “इंटेलेक्चुअलप्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)” या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे… तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखालास्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या… मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाईकरू शकतो… या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते…

आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही… मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका…

आपण आमच्या ब्लॉगला भेट देवून त्यावरील उपलब्ध असलेल्या सविस्तर लेखांचा लाभ घेवू शकता… आपल्या प्रतिक्रिया बहुमूल्य असतिल…

http://krushisamarpan.blogspot.in

टेलेग्राम एप चॅनेलवर आपण आम्हाला फॉलोव करू शकता…

telegram.me/krushisamarpan

फेसबूकवर खाती असणारे शेतकरी आपल्या ग्रूपलाही भेट देवू शकता…

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

Have any Question or Comment?

One comment on “मशरूम (आळिंबी) उत्पादन तंत्रज्ञान – डॉ. विनायक शिंदे पाटील, अहमदनगर

देवेंद्र

मी अळंबी चे उत्पादन घेऊ इच्छीतो।मला छान माहिती मिळाली आहे।

Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सहाय्यक कृषि अधिकारी

Unable to display Facebook posts.
Show error

Error: Error validating access token: The session has been invalidated because the user changed their password or Facebook has changed the session for security reasons.
Type: OAuthException
Code: 190
Subcode: 460
Please refer to our Error Message Reference.