खेकडा शेती – एक उत्तम व्यवसाय – श्री. विनायक शिंदे आणि कु. सारिका वांद्रे

खेकड्याच्या खाद्य सवयीबाबतीत असलेली लोकांची उस्तुकता आणि त्याला असलेली स्थानिक बाजारपेठ तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस वाढती मागणी पाहता नजीकच्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी भरपूर महत्व प्राप्त होणार आहे. खेकडा शेती हा कोलंबी संवर्धनाला पर्याय ठरू शकतो. हे लक्षात आल्यामुळे या कवचधारी मस्त्य प्राण्याला आता महत्व प्राप्त होऊ लागल आहे. खेकडापालन हा व्यवसाय अजूनही आपणाकडे बाल्यावस्थेत आहे. सध्या मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून त्याची नगण्य दारात विक्री करतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी २० वर्षांपूर्वीच खेकडा शेती हा व्यवसाय सुरु केलेला आहे. देशामध्ये खेकडा उत्पादनात सर्वात जास्त उत्पादक म्हणून तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, त्यापाठोपाठ गुजरात आणि केरळ यांचा क्रम लागतो. त्यामानाने महाराष्ट्राचे उत्पादन फार कमी (२८%) आहे. खेकडा शेती ही कोलंबी संवर्धनाप्रमाणे महाराष्ट्र किनारी विकसीत केल्यास नवउद्दोजकांना आणि मच्छीमारांना एक अधिक उत्पन्नाचे साधन मिळू शकणार आहे.

खेकडा शेतीसाठी महत्वाच्या जातींची निवड:
आपल्या भारताच्या सागर किनारी आढळणाऱ्या ६०० जातींपैंकी खेकडा शेतीच्या दृष्टीने खाडीतील सिल्ला सिरेटा आणि सिल्ला ट्रान्क्युबेरिका या उपयुक्त म्हणून सिद्ध झाल्या आहेत, कारण या जातींचे खेकडे कोणत्याही क्षारतेच्या पाण्यामध्ये जलद आणि मोठ्या आकारापर्यंत वाढू शकतात. या जातींचे खेकडे निकृष्ट दर्जाच्या पाण्यात म्हणजे जास्त अमोनिया आणि नायट्रेट असलेल्या पाण्यात देखिल राहू शकतात. या खेकड्यांच्या जातींमध्ये मांसाचे प्रमाण आणि चविष्ठपणा अधिक असतो. सिल्ला सिरेटा हा जास्तीत जास्त ७५० ग्रॅमपर्यंत वाढतो तर सिल्ला ट्रान्क्युबेरिका ही जात मात्र २.५ ते ३.५ किलोपर्यंत वाढू शकते. त्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना जास्त किंमत मिळते. हे खेकडे सिंगापूर, चीन आणि तैवान या देशांत निर्यात केले जातात. सध्या ९०-१०० ग्रॅम मऊ कवचाच्या (कवच टाकलेले) खेकड्यांना देखील दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपीय देशात चांगली मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे कोलंबी संवर्धनाप्रमाणे खेकडा शेती करण्यासाठी मच्छीमार आणि नवउद्दोजक पुढे येऊ लागले आहेत. म्हणूनच सिल्ल सिरेटा आणि सिल्ल ट्रान्क्युबेरिका या दोन्ही जातींना खेकडा शेतीसाठी महत्वाच्या जाती म्हणून आता पाहिले जाऊ लागले आहे. सिल्ला सिरेटा या खेकड्यांना स्थानिक भाषेत लाल कुर्ली, चिंबोरी तर सिल्ला ट्रान्क्युबेरिकाला भाटकुर्ली म्हणतात.

आवश्यक साधन सामुग्री व तयारी:
खेकडा संवर्धनासाठी कोलंबी संवर्धनाला वापरण्यात येणाऱ्या त्लावाप्रमाणेच किंवा खाडीच्या भागातील दलदलीच्या क्षेत्रात काही कारणास्तव बंद ठेवण्यात आलेले तलाव वापरले तरी चालतात. तथापी खेकडा संवर्धनासाठी शक्यतो तलावाची जागा/क्षेत्र अलिप्त असे निवडणे केव्हाही चांगले असते. खेकडा संवर्धनासाठी कमीत कमी ०.५ ते १ हेक्टर आकाराचे तलाव असावेत. आयताकृती तलावाला समोरासमोर आत व बाहेर पाणी वाहून नेणारे द्वार असावेत. खेकडा शेती पूर्वी तलाव पूर्णत: रिकामे करावेत, त्यानंतर तलाव ५-६ दिवस सूर्यप्रकाश सुकवावेत. पाण्यातील व जमिनीवरील उपद्रवी कीटक व प्राणी मारून टाकण्याकरिता अमोनियम सल्फेट (२०० किलो प्रति हेक्टर) आणि चुना (१ टन प्रति हेक्टर) वापरावे. नैसर्गिक खाद्य निर्मिती होण्याकरिता सेंद्रिय व असेंद्रिय खताची मात्रा द्यावी. खेकडे तलावातून पळून जाऊ नयेत म्हणून तलावाच्या आतील बाजूस १ मीटर उंचीचे प्लास्टिक ताडपत्री व जाळ्याचे कुंपण लावावे. खेकडे एकमेकांवर आक्रमण करू नये तसेच बिळे पाडू नये म्हणून तळाशी वाळूची ढिगारे, किल्ले, चिपीच्या फांद्या आणि पाईप ठेवावेत.

श्री. विनायक शिंदे-पाटील आणि कु. सारिका वांद्रे

योग्य खेकड्याची निवड व साठवणूक:
बिजोत्पादन केंद्रातील किंवा निसर्गातील सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रान्क्युबेरिका खेकडा पिल्ले २.५ ते ३ से.मी. पाठीच्या आकाराचे खेकडा शेती दोन प्रकारे केली जाते. पहिल्या प्रकारात खेकडा खेकडा बीजपासून ते सरासरी ५०० ग्रॅमपर्यंत खेकड्याची तलावात केली जाते. याकरिता ६-७ महिने कालावधी लागतो. दुसऱ्या प्रकारात प्रथमतः तलावाच्या आतील भागात जाळ्याच्या भिंती मारून तलावामध्ये संवर्धन (पेन कल्चर) केले जाते. त्याचा उपयोग खेकडा बीजापासून सरासरी ७०-७५ ग्रॅमपर्यंत खेकडे दोन महिन्यांकरिता वाढविले जातात. आणि मग हे खेकडे बाहेरील बाजूच्या तलावातील पाण्यात सरासरी ५०० ग्रॅम पर्यंत किंवा जास्त वाढीसाठी ठेवले जातात. वाढीसाठी त्याला ४-५ महिने लागतात. या शेतीकरिता सिल्ला सेरेटा बीज उपलब्ध झाल्यास खेकडा शेती जास्त फायदेशीर ठरू शकते. सर्वसाधारणपणे २-४ नग प्रति मीटर वर्ग प्रमाणे पहिल्या संवर्धन पद्धतीत तर दुसऱ्या पद्धतीत ०.५-१ नग प्रति मीटर वर्ग प्रमाणे बाहेरील बाजूच्या तलावातील पाण्यात साठवणूक करावेत. जेव्हा पाण्याचे तापमान कमी असते अशा वेळी म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा उशिरा संध्याकाळी सूर्यास्तानंतर खेकड्यांची साठवणूक करावी.

पाण्याचे व्यवस्थापन:
खेकडा शेती तलावात पाण्याची खोली कमीत कमी १ मीटर असावी. या तलावासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे तापमान २०-३५ सेंग्रे तर क्षारता १५-३० पीपीटी असावी. पाण्याचा साम ७.५-८.५ आणि विद्राव्य प्राणवायूची पातळी ५-७ पीपीएम असावी. पाण्याचे बदलीकरण नियमीत करणे गरजेचे नसते. मात्र खाद्याचे प्रमाण जास्त झाल्यास आणि खाद्य पाण्यात राहिल्यास पाण्याचा दर्जा खालावतो. अश्या वेळी भरतीचे पाणी घेऊन किंवा पंपाद्वारे पाणी बदलणे आवश्यक आहे. पाणी बदलताना पूर्णपणे पाणी न बदलता २/३ भागच पाणी बदलावे.

श्री. विनायक शिंदे-पाटील आणि कु. सारिका वांद्रे

खाद्याचे व्यवस्थापन:
खेकडा हा मांसभक्षक असल्यामुळे माशाची डोकी, माशाचे मांस, कोंबड्या, बकऱ्याच्या खाटिक पाऱ्यातील टाकाऊ पदार्थ, शार्क व मुशीचे पर, इत्यादी खाद्यापैकी कोणतेही खाद्य खेकडा आवडीने खातो. हे खाद्य पदार्थ वजनाच्या मात्रेनुसार दिवसातून सकाळी (४०%) व संध्याकाळी (६०%) द्यावे. मात्र खाद्य देताना ६ से.मी. पर्यंत पाठीच्या खेकड्यांना १०%, ६ से.मी. पाठीच्या खेकड्यांना ८% आणि १५ से.मी. पाठीच्या खेकड्यांना ६% खाद्य एकूण खेकड्याच्या वजनाच्या प्रमाणात द्यावे. खेकडा संवर्धनात खाद्यावर येणारा खर्च एकूण खर्चाच्या ५०% ते ६०% एवढा होतो.

वाढीचे व्यावस्थापन:
खेकड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य पाहण्यासाठी १५ दिवसांनी लिफ्टनेटद्वारे खेकडे पकडावेत. पकडलेले खेकडे काळजीपूर्वक हाताळावेत. त्यांचे वजन व लांबी घेण्यापूर्वी ते बांधून घ्यावेत. यावेळी खेकडे तळ्याच्या वरच्या बाजूला किंवा पृष्ठभागावर येतात. तेव्हा पाण्याचा दर्जा खालावलेला आहे असे समजावे. त्यावेळी नवीन खेकडे तलावात सोडावेत किंवा तलावाच्या पाण्याचे बदलीकरण करावे किंवा वाढ झाली असल्यास खेकडे विक्रीला काढावेत.

विक्रीयोग्य खेकड्याची पकडणूक:
बऱ्याच वेळा काही खेकडे तलावात लवकर विक्रीयोग्य होतात. त्यांची पकडणूक ठराविक कालावधीनंतर करणे आवश्यक असते. हे खेकडे काढल्यामुळे इतर लहान खेकडे जलद गतीने वाढतात. अशाप्रकारे संवर्धन कालावधी कमी करणे शक्य होते. हे खेकडे स्फुपनेट किंवा लिफ्टनेटद्वारे पकडले जातात, याला इंग्लीशध्ये “पर्शिअल हार्वेस्टिंग (Partial Harvesting)” म्हणतात.

तलावातील बहुतांश खेकड्यांची विक्रीयोग्य वाढ झाल्यानंतर पूर्ण तलावातील सर्व खेकड्यांची पकडणूक केली जाते. ही पकडणूक शक्यतो भरतीच्या वेळी, तलावाचे प्रवेशद्वार उघडल्यावर, पाण्याच्या प्रहावाविरुद्ध पोहण्याच्या खेकड्याच्या सवयीमुळे एकत्रितपणे केली जाते. मात्र तलावातील संपूर्ण खेकड्यांची पकडणूक ओहोटीच्या वेळी करावी. त्यामध्ये तलावात उतरून प्रत्यक्ष हाताने देखील खेकडे पकडले जातात. सर्वसाधारणपणे योग्य रितीने तलावातील खेकड्यांचे संवर्धन केल्यास खेकड्याच्या जगणुकीचे प्रमाण ५०-६०% मिळते. त्यावेळी त्यांची वाढ ३००-५००० ग्रॅमपर्यंत होते. अशाप्रकारे खेकड्याच्या संवर्धन पद्धतीने १५-२० टन प्रति हेक्टर उत्पादन घेता येते.

श्री. विनायक शिंदे-पाटील आणि कु. सारिका वांद्रे
पीएच.डी स्कोलर्स, जूनागढ कृषि विद्यापीठ, गुजरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *